(रत्नागिरी / प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन तरुण बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. एका घटनेत २२ वर्षीय साहील बाबुराव शिर्के हा तरुण १६ ऑगस्ट रोजी मध्यरात्री घरातून बाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाला, तर दुसऱ्या घटनेत २३ वर्षीय सतिश बाळाजी गोरे हा १० ऑगस्ट रोजी मोटारसायकलवरून लोटे येथे जाण्यासाठी निघाल्यानंतर बेपत्ता झाला. दोन्ही प्रकरणांत संबंधित कुटुंबीयांनी शोध घेऊनही तरुणांचा ठावठिकाणा लागला नसल्याने त्यांच्या अपहरणाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय न्यायसंहिता कलम १४०(३) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
खेड तालुक्यातील बहीरवली फाटा, सुसेरी क्रमांक १ येथील बौद्धवाडीमधून २२ वर्षीय साहील बाबुराव शिर्के हा तरुण बेपत्ता झाला आहे. १६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री सुमारे दोन वाजता तो घरातून बाहेर पडला. त्यानंतर तो घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. नातेवाईक तसेच परिचितांकडे चौकशी करूनही साहीलचा ठावठिकाणा लागला नाही. साहील शिर्के याचे वय २२ वर्षे असून, त्याचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. त्याचे अज्ञात व्यक्तीने गैरकायदेशीररीत्या प्रतिबंधित ठेवण्याच्या उद्देशाने अपहरण केले असावे, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी दीक्षा सिद्धार्थ जाधव (वय २२, व्यवसाय नोकरी, रा. शिर्शी, ता. खेड) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दुसऱ्या घटनेत खोपी येथील २३ वर्षीय सतिश बाळाजी गोरे हा तरुण बेपत्ता झाला आहे. १० ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे नऊ वाजता तो स्वतःच्या हिरो एचएफ डिलक्स मोटारसायकलने (एमएच ०८ बीबी ०५९२) खोपी येथून लोटे येथे जाण्यासाठी निघाला होता. त्यानंतर त्याचा मोबाइल बंद येत असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. १४ ऑगस्ट रोजी कुटुंबीयांनी सतिश राहत असलेल्या तसेच कामाच्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. त्यावेळी तो मागील पाच ते सहा दिवसांपासून कामावरही आला नसल्याचे समोर आले. त्यानंतर लोटे परिसरासह नातेवाईकांकडे त्याचा शोध घेण्यात आला; मात्र तो कुठेही आढळून आला नाही.
अखेर सतिशचे वडील बाबू बाळाजी गोरे (वय ४०, व्यवसाय रसवंती गृह, रा. वेरळ, खोपी फाटा, ता. खेड; मूळ रा. खोपी, गोरेवाडी) यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात व्यक्तीने सतिशचे अपहरण केले असावे, असा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणांत भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम १४०(३) अन्वये अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, खेड पोलिसांकडून बेपत्ता तरुणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. दोन्ही तरुणांच्या बेपत्ता होण्यामागील नेमके कारण आणि त्यांचा सध्याचा ठावठिकाणा तपासातून स्पष्ट होणार आहे.


