(खेड / प्रतिनिधी)
लोटे-पारशुराम औद्योगिक वसाहतीत प्रस्तावित असलेल्या कोका कोला कंपनीच्या प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य द्यावे, या मागणीसाठी सोमवारी (दि. १४ जुलै) असगणी गावात मोठा जनआक्रोश उसळला. शेकडो ग्रामस्थांनी घोषणा देत रस्त्यावर उतरून जोरदार मोर्चा काढला.
हा मोर्चा असगणी ग्रामपंचायत कार्यालयापासून निघून औद्योगिक वसाहतीत फेरफटका मारत पुन्हा ग्रामपंचायत कार्यालयासमोर येऊन शांततेत संपवण्यात आला. ‘इंटरनॅशनल युनियन फॉर फूड वर्कर्स’ या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी या आंदोलनाचे आयोजन केले.
कोकणातील हा एक महत्वाचा औद्योगिक प्रकल्प असल्याने स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशी अपेक्षा होती. मात्र नोकरभरती प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. “स्थानिकांना डावलून बाहेरील उमेदवारांना नोकऱ्या दिल्या जात आहेत,” अशी तीव्र नाराजी यावेळी अनेकांनी व्यक्त केली.
या प्रसंगी असगणीच्या सरपंच संजना बुरटे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, गावातील अनेक तरुण बेरोजगार आहेत. आम्ही यापूर्वीही ५ जून रोजी मूक मोर्चा काढून मागणी केली होती. मात्र अद्याप कंपनीकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळेच आजचा मोर्चा अधिक तीव्र करण्यात आला. आता तरी शासन व कंपनीने जागे होणे गरजेचे आहे. अन्यथा गावकऱ्यांच्या भावना उद्रेकाच्या दिशेने जातील.
आंदोलन उग्र होण्याची शक्यता
ग्रामस्थांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, जर भूमिपुत्रांना न्याय न मिळाल्यास हे आंदोलन पुढील काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापनासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.