(संगमेश्वर)
मे महिन्याच्या सुट्टीत संगमेश्वर परिसरातील बालकलावंतांनी विविध कलाकौशल्य आणि पारंपरिक खेळांत रमून सुट्टीचा मनमुराद आनंद घेतला. मोबाईल आणि स्क्रीनपासून दूर राहून संगीत, चित्रकला, मैदानी खेळ, आणि पारंपरिक वाद्ये वाजवण्याच्या उपक्रमांनी गावात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
शौर्य समीर अंब्रे (नावडी) याने वडील समीर अंब्रे यांच्या भजनकार म्हणून असलेल्या प्रभावामुळे सुट्टीत नाल व मृदुंग वादनाची कला आत्मसात केली. ढोल वाजवणे आणि पालखी नाचवणे यातही त्याची विशेष रुची दिसून आली.
रामपेठ येथील रिजुल सचिन शेरे याने कॅसिओवर विविध गाणी वाजवण्याचा छंद जोपासत स्वतःसाठी विरंगुळ्याची वाट शोधली आहे. आपल्या भाऊ पारस आणि अन्वेष यांच्यासोबत तो वेगवेगळी वाद्ये वाजवण्यात रमला आहे. निढळेवाडी येथील सुयश साजन वाडकर याने देखील कॅसिओ वादनासोबतच क्रिकेट खेळण्यात आपली सुट्टी आनंदाने साजरी केली.
अलक्ष अक्षय शेट्ये हा तर चित्रकलेत गुंतलेला असून क्रिकेटपटूंचे पेन्सिल स्केचेस काढण्याचा छंद जोपासत आहे. पत्ते आणि कॅरम यांसारखे घरगुती खेळ त्याच्या भावंडांसह आर्या, आरोह, अथर्व, अनघ आणि ७० वर्षांचे आजोबा अनिल शेट्ये यांच्या सोबतीने तो साकार करत आहे.
सुट्टीत मोबाईलपासून दूर राहून मुलांनी पारंपरिक खेळ आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे हे चित्र विशेष लक्षवेधी ठरले आहे. घरातील ज्येष्ठांनी जर मुलांना पारंपरिक खेळांची ओळख करून दिली, तर ती मोबाईलपासून दूर राहू शकतात, याचे हे प्रेरणादायक उदाहरण ठरले आहे.