(रत्नागिरी)
जयगडमधील जांभारी फाटा परिसरात सैतावडे ते खंडाळा रोडवर रात्रीच्या सुमारास एक आयशर ट्रक अचानक पेट घेतल्याची घटना घडली. वाहन चालू अवस्थेत असताना ट्रकमध्ये आग लागल्यामुळे काही काळ खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. वेळेवर हस्तक्षेप करत त्यांनी आग आटोक्यात आणली आणि मोठा अनर्थ टळवला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ट्रकचालकाची प्रसंगावधान राखल्यामुळे संभाव्य धोका टळला.
या घटनेमुळे सैतावडे–खंडाळा मार्गावर काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठी हानी टळली असून, आग लागण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही.