(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील चाफवली येथील चाफनाथ मंदिरात सालाबाद प्रमाणे होणारा चैत्रशिवरात्र उत्सव शनिवार दि.26 रोजी साजरा केला जाणार आहे. या उत्सवानिमित्त या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
शनिवार 26 एप्रिल रोजी सकाळपासूनच चाफवलीच्या पांडवकालीन एका दगडातील या चाफनाथ मंदिरात उत्सवाला मंत्र, जप, पूजा, अर्चा अशा विविध कार्यक्रमानी सुरुवात होणार आहे. या उत्सवानिमित्त मंदिर परिसरात विद्युत रोषणाई केली जाते. तसेच मंडप डेकोरेशन केले जाते. या मंदिर परिसरातील निसर्ग सौंदर्य मनमोहुन टाकते. नागमोडी धावणारी नदी तिच्या पाण्याचा येणारा खळखळ आवाज, विविध पक्षांची किलबिल, मधमाशांची पोळी, मयूर पक्षांचे दर्शन मनाला एक वेगळा आनंद देऊन जाते.
या दिवशी या मंदिरात मंत्र, जप, छबिना, राजू वळामे यांचे सुश्राव्य भजन, रात्रो 11 वा. कोकणातील गाजत असलेले देवरूख कोलेवाडी येथील नमनाचा कार्यक्रम होणार आहे. या दिवशी निसर्ग सौंदर्य आणि भक्तीचा सुरेख मेळ या परिसरात साधला जाणार आहे.
रविवार दिनांक 27 रोजी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. तरी परिसरातील भाविकांनी या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन चाळके बंधू आणि चाफवली ग्रामस्थांनी केले आहे.