(संगमेश्वर / एजाज पटेल)
सोनवी नदीपात्रात कथितरीत्या बेकायदेशीररीत्या करण्यात आलेल्या वाळू उत्खननामुळे निर्माण झालेल्या अवाढव्य आणि धोकादायक डोहात गणेश विसर्जनावेळी बुडून एका निष्पाप, उच्चशिक्षित तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेला पूर्ण पंधरवडा उलटून गेला असतानाही संबंधित ठेकेदारावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने संगमेश्वर तालुक्यात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होणार का आणि प्रशासन या प्रकरणाची जबाबदारी निश्चित करणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या दुर्घटनेनंतर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात जनक्षोभ व्यक्त झाला होता. मात्र, एवढी गंभीर घटना घडल्यानंतरही संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवध तसेच अनधिकृत गौणखनिज उत्खननाअंतर्गत कारवाईचे कोणतेही स्पष्ट संकेत अद्याप मिळालेले नाहीत, असा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदार आणि वाळू माफियांना प्रशासनाचेच पाठबळ आहे का, असा थेट सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सोनवी आणि परचुरी या दोन्ही नदीपात्रांमध्ये अवाढव्य पोकलेन आणि हायवा उतरवून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप आहे. महामार्गाच्या कामासाठी वाळूचा उपसा करताना नियम, कायदे आणि सुरक्षेच्या निकषांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या उत्खननामुळे नदीपात्रात ठिकठिकाणी मोठे आणि धोकादायक डोह निर्माण झाले.
दरवर्षी शेकडो नागरिक आणि भाविक ज्या संवेदनशील ठिकाणी गणपती विसर्जनासाठी येतात, त्याच परिसरात हे धोकादायक डोह निर्माण झाले होते. स्थानिक ग्रामस्थांनी वेळोवेळी या धोक्याची माहिती देत खड्डे बुजवावेत किंवा किमान बॅरिकेड्स आणि सूचना फलक लावावेत, अशी मागणी केल्याचे सांगितले जाते. मात्र, या मागण्यांकडे ठेकेदार आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. अखेर गणेश विसर्जनावेळी संबंधित युवकाचा पाय घसरून तो या डोहात बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला.
या घटनेला पंधरवडा उलटूनही दोषी ठेकेदार किंवा संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून गुन्हे दाखल करण्याबाबत ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. एका तरुणाचा जीव गेला, त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आणि शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाल्याचा आरोप असतानाही प्रशासनाची भूमिका शांत का आहे, असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणाची तीव्रता लक्षात घेता दोषींवर कारवाई करण्याऐवजी संपूर्ण प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे का, अशीही चर्चा नागरिकांमध्ये आहे.
दरम्यान, ज्या डोहामुळे संबंधित युवकाचा मृत्यू झाला, तो धोकादायक डोह पंधरवडा उलटूनही तसाच उघडा असल्याचे सांगितले जात आहे. नदीपात्रात गुराखी तसेच पोटाची खळगी भरण्यासाठी मासेमारी करणाऱ्यांची ये-जा असते. त्यामुळे या ठिकाणी भविष्यातही दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याची चिंता व्यक्त होत आहे. हा धोकादायक डोह बुजविण्यासाठी प्रशासनाकडून अद्याप कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून धोकादायक डोह तातडीने सुरक्षित करावेत आणि संबंधित प्रकरणात जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे. निष्पाप तरुणाचा बळी गेल्यानंतरही प्रशासन आणखी किती दुर्घटनांची वाट पाहणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात असून या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कारभाराविरोधात तीव्र चीड आणि रोष व्यक्त होत आहे.


