(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
शिवणे ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांच्या वतीने देवरुख तहसील कार्यालयासमोर दोन प्रमुख मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनात गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले असून, मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे सरपंच मारुती (राजू) पवार यांनी स्पष्ट केले.
मयूरबाग ते नांदळदज फाटा रस्त्याचे पूर्ण काम व्हावे
ग्रामस्थांची पहिली मागणी मयूरबाग ते नांदळदज फाटा (६ किमी) रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पूर्ण करावी, ही आहे. सध्या यापैकी केवळ ३.५ किमी अंतराचे काम पूर्ण झाले असून उर्वरित २.५ किमी रस्ता अत्यंत खराब अवस्थेत आहे. या रस्त्यावर खड्डे आणि उघड्या खड्यांमुळे प्रवास धोकादायक बनला आहे.
सरपंच मारुती पवार यांनी सांगितले की, “या रस्त्याचे अनेक वेळा डांबरीकरण व दुरुस्ती मागितली, मात्र प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत आहे. अन्य गावांचे रस्ते पूर्ण होत असताना, शिवणे गावाचा रस्ता का मागे राहतो, याचे आश्चर्य वाटते.”
शिवणे शाळेसाठी नवीन वर्ग खोली मंजूर करावी
शिवणे शाळा क्र. १ मध्ये सध्या पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग आहेत आणि २२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दोन वर्ग खोल्यांची गरज असताना केवळ एका खोलीसाठीच निधी मंजूर झाला आहे. उर्वरित वर्गासाठी वेळोवेळी मागणी व वरिष्ठ स्तरावर पत्रव्यवहार करूनही दुसऱ्या खोलीसाठी निधी मिळालेला नाही. पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे कठीण जाणार असून, ही समस्या तातडीने सोडवावी, अशी ग्रामस्थांची भूमिका आहे.
ग्रामस्थांचा सहभाग आणि आंदोलनाचा पुढील इशारा
या उपोषणात सरपंच मारुती (राजू) पवार, उपसरपंच अमोल रसाळ, ग्रामपंचायत सदस्य सतीश गेले, सानिया पवार, सुभाष पाचकळे, विजयकुमार शिंदे, स्वप्नील मोहिते, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल पवार सहभागी झाले आहेत. गावातील महिलांनीही मोठ्या संख्येने उपोषणात सहभाग घेतला. प्रशासनाने यापुढेही दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.