(देवरूख / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील वांझोळे सुवारेवाडी येथे आज (शुक्रवारी) पहाटे चारच्या सुमारास घरात शिरलेल्या बिबट्याने ६० वर्षीय महिलेवर हल्ला केल्याची खळबळजनक घटना घडली. प्रतिभा प्रकाश दळवी या बिबट्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी धैर्य आणि समयसूचकता दाखवत तब्बल अर्धा तास घरात बिबट्याचा सामना केला.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास कोंबड्यांच्या शोधात बिबट्या थेट घरात शिरला. त्याने घरातील कोंबड्यांवर हल्ला करून त्यांना फस्त केले. याचवेळी प्रतिभा दळवी यांचा बिबट्याशी सामना झाला. बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केल्याने त्या गंभीर जखमी झाल्या.
बिबट्या घरात असल्याचे लक्षात आल्यानंतरही दळवी यांनी प्रसंगावधान राखले. त्यांनी धाडसाने घराचा पुढील दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच बिबट्याने घरातून बाहेर पडत जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जखमी प्रतिभा दळवी यांना तातडीने देवरूख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे देवरूखचे वनपाल सागर गोसावी, वनरक्षक सहयोग कराडे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी महिलेची भेट घेतली. माजी नगरसेवक प्रफुल्ल भुवड यांच्यासह वांझोळे येथील ग्रामस्थही रुग्णालयात उपस्थित होते.
वांझोळे परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करून ग्रामस्थांना सुरक्षितता मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून वनविभागाकडे करण्यात आली आहे.

