(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील जयगड नजीकच्या नांदिवडे गावात जिंदाल कंपनीकडून गॅस टर्मिनल च्या कामाला महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई यांचेकडून काम थांबविण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र शासनाचा आदेश मोडून जिंदाल कंपनीकडून आज बुधवारी 12 जून पासून गॅस टर्मिनल चे काम सुरू करण्यात आले.
परंतु नांदिवडे गावातील स्थानिक ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेऊन गॅस टर्मिनलचे सुरू झालेले काम तात्काळ बंद पाडले. त्यानंतर जाब विचारण्यासाठी जिंदाल कंपनीच्या अधिकाऱ्यांना गॅस टर्मिनल जागेच्या ठिकाणी ग्रामस्थांनी बोलावले असता अधिकाऱ्यांनी स्पष्ट सांगितले की, आमचा एलपीजी गॅस टर्मिनलशी काही संबंध नाही. मात्र तेच अधिकारी सामान्य शेतकऱ्यांना फसवून गॅस सेफ्टी विषयी माहिती देत असल्याचे काही जाणकार ग्रामस्थांनी सांगितले. या कारणाने संतप्त झालेल्या स्थानिक ग्रामस्थांनी जयगड पोलीस स्थानक व महाराष्ट्र सागरी मंडळ जयगड यांचेकडे तक्रार दाखल केली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई यांनी गॅस टर्मिनस चे काम तात्काळ थांबवले. मात्र देखील आज बुधवारी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी काम सुरु करण्याचा प्रयत्न केला. सरकार आमच्या खिशात या भूमिकेत सध्या जिंदाल कंपनी वागत आहे. स्थानिक लोकांचा विरोध असताना, शासनाच्या कुठल्याही विभागाची परवानगी नसताना जिंदाल कंपनी मनमानी करून नांदिवडे च्या माथ्यावर लोकवस्तीमध्ये गॅस टर्मिनल उभारत आहे. आधीच जिंदाल कंपनीच्या कोळशाचे धूळ आणि राख याचा स्थानिक लोकांना खूप त्रास होत आहे. श्वसनाच्या वाटे कोळशाची धूळ व राख याने लोक आजारग्रस्त झालेले आहेत. तसेच नांदिवडे आणि जयगड परिसरामध्ये कॅन्सरग्रस्त रोगाचे रुग्ण, त्वचेचे आजार असलेले रुग्ण, श्वसनाचे आजार असलेले रुग्ण मोठ्या प्रमाणात होत आहेत. एवढा त्रास असून देखील कंपनी गावामध्ये गॅस टर्मिनल उभारत आहे.
स्थानिक लोकांचा विरोध आहे. प्रदूषण विभाग, जिल्हाधिकारी, सागरी मंडळ, पेसो या सर्व विभागांची परवानगी नाही कंपनी कोणाच्या जीवावर उड्या मारत आहे, मनमानी कारभार करत आहे. याचा उलगडा झाला पाहिजे. सर्व शेतकरी, मच्छीमार कंपनी, प्रशासनावर नाराज आहेत. शासनाने या सर्व गोष्टीची दखल घेऊन लवकरात लवकर गॅस टर्मिनल लोकवस्तीतून स्थलांतर करावा. जिंदाल कंपनीवर कारवाई करावी, अशी स्थानिक शेतकरी आणि मच्छीमारांची मागणी आहे.