(रत्नागिरी/ प्रतिनिधी)
शहरानजीक असलेल्या लायन्स आय हॉस्पिटलच्या नर्सिंग होम नोंदणी नूतनीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला असून, जिल्हा परिषद आरोग्य विभागाने रुग्णालय प्रशासनाला सात दिवसांची अंतिम मुदत दिली आहे. नोंदणी प्रमाणपत्राची वैधता ३१ मार्च २०२६ रोजी संपुष्टात आल्यानंतरही आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने आरोग्य विभागाने आता कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. मुदतीत त्रुटींचे निराकरण न झाल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द करण्याची कार्यवाही केली जाऊ शकते.
बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन ॲक्ट १९४९ नुसार रुग्णालयाच्या नोंदणीचे नूतनीकरण करणे बंधनकारक आहे. २०२६-२७ या वर्षासाठी लायन्स आय हॉस्पिटल प्रशासनाने ऑनलाइन अर्ज दाखल केला असला, तरी नूतनीकरणासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली नाहीत. यामध्ये रुग्णालयातील विविध विभागांचे साइट लेआउट, इमारतीचे बांधकाम पूर्णत्व प्रमाणपत्र तसेच आवश्यक स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. त्यामुळे अर्जाची प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे. या प्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी १३ नोव्हेंबर २०२६ रोजी लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष वामन बेडेकर यांना अधिकृत पत्र पाठवून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष म्हणजे, डिसेंबर २०२५ पासून आरोग्य विभागाकडून रुग्णालय प्रशासनाला वारंवार नोटिसा आणि स्मरणपत्रे देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्ण न झाल्याने अखेर विभागाने सात दिवसांची मुदत निश्चित केली आहे.
या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे रुग्णालयाची प्रत्यक्ष क्षमता ३० खाटांची असताना ऑनलाइन नूतनीकरण अर्जात ६० खाटांची नोंद करण्यात आली आहे. अर्जातील ही विसंगती आरोग्य विभागाने निदर्शनास आणून देऊनही त्यात आवश्यक दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याचे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी रुग्णालयांना नोंदणी आणि तिचे नियमित नूतनीकरण बंधनकारक असल्याचे स्पष्ट करत, दिलेल्या मुदतीत सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यामुळे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या या रुग्णालयाच्या नूतनीकरणाचा प्रश्न आता केवळ प्रशासकीय प्रक्रियेपुरता मर्यादित न राहता आरोग्य विभागाच्या नियामक यंत्रणेच्या कार्यवाहीच्या केंद्रस्थानी आला आहे. निर्धारित मुदतीत रुग्णालय प्रशासन कागदपत्रांची पूर्तता करणार का, याकडे आता रत्नागिरीकरांचे लक्ष लागले आहे.


