(संगमेश्वर /प्रतिनिधी)
भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा संगमेश्वर अंतर्गत विभाग देवरुख यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. येथील आंबेडकर पुतळा परिसरात आयोजित या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून संजय जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी समता सैनिक दलाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर अध्यक्ष संजय जाधव व प्रमुख मार्गदर्शक विजय जाधव यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. बौद्धाचार्य संघाच्या वतीने त्रिशरण पंचशील व सूत्रपठण घेऊन कार्यक्रमाची पुढील रूपरेषा पार पडली.

यानंतर झालेल्या सभेत उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक विजय जाधव यांनी ‘धम्मक्रांती’ या विषयावर भाष्य करताना सांगितले की, जगातील अनेक क्रांत्या सत्तेसाठी, संपत्तीसाठी आणि प्रतिष्ठेसाठी झाल्या; मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडविलेली धम्मक्रांती ही समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांसाठी होती. “ही क्रांती रक्ताचा एकही थेंब न सांडता मानवाला मानसिक गुलामगिरीतून मुक्त करणारी आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी घडलेली ही ऐतिहासिक घटना जगातील सर्वात मोठ्या सामाजिक परिवर्तनांपैकी एक असून ती शोषितांच्या स्वाभिमानी जीवनाचा पाया आहे,” असे त्यांनी नमूद केले. अध्यक्षीय भाषणात संजय जाधव यांनी संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेत उपस्थितांच्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमात कु. श्रेया बाळकृष्ण जाधव हिने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद सावंत यांनी केले. या प्रसंगी वि. ल. मोहिते, संजीवन सावंत, संतोष कांबळे, महावीर कांबळे, अरुण सावंत, कृष्णा कदम, चंदन कदम, चंद्रकांत जाधव, चंद्रशेखर जाधव आदी पदाधिकारी, समता सैनिक दलाचे सदस्य तसेच परिसरातील उपासक-उपासिका व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

