(रत्नागिरी / प्रतिनिधी)
“छातीत दुखत आहे, म्हणून कामावर येणार नाही” असे स्पष्ट सांगितल्याचा राग आल्याने रांगमेश्वर तालुक्यातील लोवले येथे एका मजुरावर तिघांनी मिळून प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मजुराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, या प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ही घटना सोमवारी (९ जून) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास लोवले येथे घडली. विकास किसन चव्हाण (वय २६, सध्या रा. लोवले, मूळ रा. अलिबादी तांडा, विजापूर, कर्नाटक) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार नामदेव चव्हाण (वय ४६), विनोद नामदेव चव्हाण (वय २२) आणि अनिल चव्हाण (वय २७) या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विकास यांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, ते आणि आरोपी हे सर्व कर्नाटकातून आलेले असून सध्या लोवले येथे कामासाठी राहतात. सोमवारी सायंकाळी कामावर न येण्याचे कारण विचारल्यावर विकास यांनी छातीत दुखत असल्याचे सांगितले. मात्र, या उत्तराने संतापलेले नामदेव चव्हाण यांनी “तुझे अजून पैसे फिटलेले नाहीत” असे म्हणत विकास यांना शिवीगाळ केली आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.
या गोंधळात अनिल चव्हाणने जवळच पडलेली लाकडी रिप उचलून विकास यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूवर जोरात घाव घातला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्याचवेळी हस्तक्षेपासाठी धावून आलेल्या विकास यांच्या पत्नी आरती चव्हाण यांनाही आरोपींनी जमिनीवर ढकलून दिले. त्यानंतर तिघांनी संगनमत करून पुन्हा एकदा विकास यांच्यावर हल्ला केला.
ही घटना घडल्यानंतर विकास चव्हाण यांनी मंगळवारी (१० जून) मध्यरात्री १.४५ वाजता संगमेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८ (१), ३५२, आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार व्ही. व्ही. मनवल करत आहेत.