(संगमेश्वर / प्रतिनिधी)
लघुशंकेसाठी रस्त्यालगत थांबलेल्या तरुणावर रानगव्याने हल्ला केल्याने गंभीर जखमी झालेल्या ३६ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आंबव येथे ४ सप्टेंबर रोजी झालेल्या या घटनेनंतर तब्बल बारा दिवस उपचारांची झुंज दिल्यानंतर तरुणाचा डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात मृत्यू झाला. या घटनेची देवरुख पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. स्वप्निल जयराम पेंडांमकर (वय ३६, रा. सह्याद्रीनगर, साडवली, देवरुख, ता. संगमेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास स्वप्निल पेंडांमकर हे आंबव येथील श्रवण हॉटेलजवळ लघुशंकेसाठी थांबले होते. याचवेळी अचानक रानगव्याने त्यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यात स्वप्निल गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्यानंतर रत्नागिरीतील चिरायु हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. पुढील उपचारांसाठी त्यांना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्यात आले. वालावलकर रुग्णालयात स्वप्निल यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी खबर देणारे अनिकेत विजय सुर्वे यांनी देवरुख पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार आकस्मिक मृत्यू क्रमांक ३८/२०२६ अंतर्गत भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. या घटनेची नोंद १६ सप्टेंबर रोजी दुपारी ३.२३ वाजता करण्यात आली असून, पुढील तपास देवरुख पोलिसांकडून सुरू आहे.


