(साखरपा / दीपक कांबळे)
तिवरे तर्फे देवळे (ता. संगमेश्वर) येथील बौद्धवाडीत शुक्रवारी सायंकाळी एक शिळकरी कस्तुर नावाचा रंगीत व दुर्मीळ पक्षी जखमी अवस्थेत आढळला. स्थानिक पत्रकार दीपक कांबळे यांच्या घराशेजारी हा पक्षी जमिनीवर पडलेला दिसला. पक्षाला स्वतंत्रपणे उडता येत नसून, तो अन्न-पाण्याचे सेवन देखील व्यवस्थित करू शकत नाही, अशी माहिती कांबळे यांनी दिली.
निसर्गातील आकर्षक रंगसंगती आणि वैशिष्ट्यपूर्ण रूपामुळे हा पक्षी ओळखला जातो. मात्र सध्या तो गंभीर अवस्थेत असून त्याला तातडीने उपचार व देखरेखीची आवश्यकता आहे. पक्ष्याचे नेमके खाद्य काय आहे, याबाबत स्थानिकांना ठोस माहिती नसल्याने त्याची काळजी घेणे कठीण ठरत आहे.
निसर्गातील या सुंदर प्राण्याला वेळीच मदत मिळणे अत्यावश्यक आहे, असे आवाहन स्थानिक नागरिकांनी केले असून, प्राणी व पक्षीप्रेमींनी पुढे येऊन या पक्षाला जीवदान द्यावे, अशी विनंती करण्यात आली आहे. परिसरातील निसर्गप्रेमी, वन विभाग अधिकारी किंवा पक्षी अभ्यासकांनी या पक्षाबाबत अधिक माहिती देऊन त्याच्या उपचारासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी 93099 14571 दिपक कांबळे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

