(देवरुख / प्रतिनिधी)
कोकणातील एकमेव सृजन विज्ञान केंद्र, देवरुख येथे अद्ययावत अवकाशशास्त्र आणि तंत्रज्ञान संग्रहालय उभारण्यात आले आहे. या संग्रहालयाचे उद्घाटन सोमवार, ७ सप्टेंबर रोजी संगमेश्वर-चिपळूण मतदारसंघाचे आमदार श्री. शेखरजी निकम यांच्या हस्ते, गणपतीपुळे देवस्थान मंडळाचे अध्यक्ष श्री. निलेशजी कोल्हटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात अगदी मोजक्याच ठिकाणी अवकाशशास्त्राशी संबंधित संग्रहालये असून, देवरुख येथे असे संग्रहालय उभारण्यात येत असल्याने ही परिसरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. या संग्रहालयात भारतीय अवकाशशास्त्राच्या इतिहासाची माहिती देणारे विविध एक्झिबिट्स मांडण्यात आले आहेत. तसेच इस्रोने विकसित केलेल्या क्रायोजेनिक इंजिन, विकास इंजिन, विक्रम लँडर, मंगळयान, गगनयान, पीएसएलव्ही आणि एसएसएलव्ही आदींची मॉडेल्स व त्यांची माहिती विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
जागतिक अवकाश संशोधनाची माहिती देणाऱ्या अपोलो-११ मून लँडर, चॅलेंजर स्पेस शटल, क्युरिऑसिटी मार्स रोव्हर आणि आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राच्या प्रतिकृतींचाही संग्रहालयात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय विश्वाची व्याप्ती समजावून सांगणारी भव्य पॅनल्स उभारण्यात आली आहेत. संगणकावर प्रतिमा उपलब्ध करून देणारी सहा इंच व्यासाची स्वयंचलित सेलेस्ट्रॉन दुर्बीण हे या संग्रहालयाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
सुमारे ३६ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या अवकाशशास्त्र व तंत्रज्ञान संग्रहालयाचा विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सृजन विज्ञान केंद्राचे संस्थापक तथा देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत आणि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. चंद्रशेखर केदारी यांनी केले आहे.

