(देवरूख)
तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने आणि तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या वतीने आयोजित सबज्युनिअर अजिंक्यपद राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धा दि. २६ ते २८ डिसेंबर रोजी वासुदेव हॉल, उद्यमनगर (आर.एस.एन. हॉटेलच्या मागे), मुंबई–गोवा महामार्ग, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे होणार आहे. या स्पर्धेत राज्यभरातून सुमारे ६०० खेळाडू सहभागी होणार आहेत.
या स्पर्धेसाठी संगमेश्वर तालुका तायक्वांडो अकॅडमीअंतर्गत कार्यरत नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लबचे खेळाडू रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. फाईट प्रकारात लक्ष्मी मोघे, ऋतिक कांगणे, सोमांश सावंत आणि दुर्गा मोघे, तर पुमसे प्रकारात सोमांश सावंत आणि दुर्गा मोघे यांची निवड झाली आहे.
निवड झालेल्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी नगरपंचायत देवरुख तायक्वांडो क्लब येथे छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. क्लबच्या उपाध्यक्षा ॲड. सौ. पुनम चव्हाण आणि उपाध्यक्ष संदेश जागुष्टे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी तालुक्याचे प्रमुख प्रशिक्षक शशांक घडशी, क्लब सदस्या रूपाली कदम, पालक प्रतिनिधी अदिती लोध, प्रशिक्षक स्वप्निल दांडेकर, सुमित पवार तसेच खेळाडू दुर्वा मोघे, पिहू कांगणे, मृण्मयी सावंत आदी उपस्थित होते.
निवड झालेल्या खेळाडूंना तालुका अकॅडमीचे अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुभाष बने, आमदार शेखर निकम, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, क्लब अध्यक्षा सौ. स्मिता लाड, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष रोहन बने, देवरुख नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, माजी उपनगराध्यक्ष अभिजित शेट्ये, जिल्हा संघटना अध्यक्ष व्यंकटेश्वरराव कर्रा यांच्यासह अनेक मान्यवर, प्रशिक्षक आणि ज्येष्ठ खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

