(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गद्रे वखार विसर्जन ठिकाण (शास्त्री नदी) येथे आज दिनांक ९ जून २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ६.३० या वेळेत नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अनुषंगाने मॉकड्रिलचे आयोजन करण्यात आले. आपत्तीच्या प्रसंगी स्थानिक प्रशासन, पोलीस, होमगार्ड, व बचाव पथकांमध्ये समन्वय साधून योग्य प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने हे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
मॉकड्रिलमध्ये पूरस्थितीत नागरिकांचे रक्षण कसे करावे, बोट चालवण्याचे प्रशिक्षण, तसेच घरगुती टाकाऊ वस्तूंचा वापर करून आपली सुरक्षा कशी करता येईल याचे सविस्तर मार्गदर्शन व प्रात्यक्षिके दाखवण्यात आली.
या मॉकड्रिलसाठी २ पोलीस अधिकारी व १० पोलीस अंमलदार, ६ होमगार्ड, नावडी येथील ८ प्रशिक्षित पोहणारे सदस्य, ग्रामपंचायत नावडीचे ५ कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थांनाही या उपक्रमात सहभागी करून आपत्ती काळात सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित करण्यात आली. नैसर्गिक आपत्तीच्या काळात दक्षता, संयम आणि सहकार्य कसे महत्वाचे आहे, हे या उपक्रमातून प्रभावीपणे पटवून देण्यात आले.