(संगमेश्वर / एजाज पटेल)
श्री कालभैरव भैरीभवानी मंदिर, कसबा येथे आयोजित काव्यसंमेलन व मनःस्वास्थ्य चर्चासत्राचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. साहित्यिक, कवयित्री व समाजसेविका डॉ. सौ. अलका नाईक आणि निसर्गोपचार तज्ञ डॉ. प्रकाश कोंडेकर यांच्या वैयक्तिक पुढाकारातून, तसेच सौ. मिनल कोंडेकर यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. आई भैरीभवानीच्या दर्शनासाठी आलेल्या मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व उद्देशपर परिचयाने झाली. मालवणी भाषेचे सुप्रसिद्ध नाटककार कै. गंगाराम गवाणकर यांना अभिवादन करण्याचा मुख्य हेतू असलेल्या या कार्यक्रमात साहित्य, संस्कृती आणि मानसिक आरोग्य यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला.
काव्यसंमेलनात स्थानिक साहित्यप्रेमी, कवी, विद्यार्थी, शिक्षक आणि समाजकार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध काव्यरचना, भावकविता, सामाजिक संदेश असलेल्या कविता व भक्तिगीते प्रभावीपणे सादर झाल्या. या प्रसंगी अलका ताईंनी स्वतः लिहिलेल्या कविता सादर करून उपस्थितांना साहित्यिक आनंदाची अनुभूती दिली. तसेच समाजकार्य अनेक प्रकारे कसे करता येते, देहदानाचे महत्त्व काय आहे याबाबत त्यांनी संवेदनशील मार्गदर्शन केले. कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतलेल्या सर्व कवी, साहित्यिक व मान्यवरांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी अलका ताईंनी स्वतः लिहिलेला, कोकणातील परंपरा व संस्कृतीचे वर्णन करणारा पोवाडा सादर केला, ज्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साह व अभिमानाची भावना निर्माण झाली.
निसर्गोपचार तज्ञ डॉ. प्रकाश कोंडेकर यांनी “आहारच आपले आरोग्य घडवतो” या विचारावर प्रकाश टाकत आहाराचे राजसी, सात्विक आणि तामसी असे तीन प्रकार स्पष्ट केले. सात्विक आहार आरोग्यास सर्वाधिक हितकारी असल्याचे त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून पटवून दिले. नैसर्गिक जीवनशैली, आहारशुद्धी आणि मन-शरीर संतुलन यांवर त्यांनी उपयुक्त मार्गदर्शन केले.
सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक मूल्यांचा संगम घडवणारा हा उपक्रम मान्यवरांनी एकत्रितपणे साकारला असून नागरिकांच्या सहभागामुळे तो विशेष यशस्वी ठरला. मालवणी भाषेची जपणूक, साहित्याला मिळालेले मुक्त व्यासपीठ आणि मानसिक आरोग्य जागृती यांमुळे हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनात आनंद, समाधान आणि प्रेरणा निर्माण करणारा ठरला.

