(संगमेश्वर / एजाज पटेल)
“गावाकडे लग्न आहे… पैशांची खूप अडचण आहे साहेब… हे सोन्याचे दागिने ठेवा आणि जेवढे होतील तेवढे पैसे द्या…” अशी भावनिक बतावणी करत एका तरुणाला तब्बल साडेतीन लाखांचा गंडा घालणाऱ्या आंतरराज्य टोळीचा संगमेश्वर पोलिसांनी थरारक पर्दाफाश केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र कुमार मोहनलाल परमार (रा. राजस्थान) याला पोलिसांनी अत्यंत शिताफीने अटक केली असून, त्याच्याकडून दोन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
‘यंग लुक’ दुकानातून फसवणुकीचा डाव
या धक्कादायक प्रकाराची सुरुवात २० एप्रिल २०२६ रोजी लांजा येथील ‘यंग लुक’ कपड्याच्या दुकानातून झाली. बेनी खुर्द गुजरवाडी येथील दिलेश प्रकाश गुजर हे नेहमीप्रमाणे दुकानात काम करत असताना दुपारी दोन अनोळखी इसम दुकानात आले. राजस्थानी हिंदी लहेजात बोलत त्यांनी दिलेश यांच्याशी ओळख वाढवली.
“गावाकडे लग्न आहे… आर्थिक अडचणीत आहोत… आमच्याकडे जुन्या धाटणीचे सोन्याचे दागिने आहेत,” अशी कहाणी सांगत त्यांनी विक्रीचा प्रस्ताव मांडला.
आधी खरे मणी, मग लाखोंचा गंडा
विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी जोंधळी मणी आणि तारेत गुंफलेला हार दिलेश यांना दाखवला. संशय येऊ नये म्हणून हारातील काही मणी तोडून तपासणीसाठी दिले. बाजारात तपासणी केल्यानंतर ते खरे सोने असल्याचे निष्पन्न झाले आणि दिलेश यांचा आरोपींवर पूर्ण विश्वास बसला. यानंतर आरोपींनी मोबाईलवरून संपर्क साधत संपूर्ण दागिने ३ लाख ५० हजार रुपयांत देण्याचे ठरवले.
२८ एप्रिल रोजी आरोपींनी दिलेश यांना रोख रक्कम घेऊन संगमेश्वर एसटी स्थानक परिसरात बोलावले. तिथे गोड बोलून त्यांनी पुन्हा विश्वास जिंकला आणि दिलेश यांनी ३ लाख ५० हजार रुपये देऊन दागिने घेतले. मात्र आरोपी निघून गेल्यानंतर दागिन्यांची सखोल तपासणी केली असता ते बनावट असल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दिलेश यांनी तातडीने संगमेश्वर पोलीस ठाण्यात धाव घेतली.
संगमेश्वर पोलीस ‘अॅक्शन मोड’मध्ये
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण देसाई यांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. आरोपी आंतरराज्य टोळीचे असल्याने ते पसार होण्याची शक्यता गृहित धरून पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला.
तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी रायगड परिसरात सापळा रचत मुख्य आरोपी जितेंद्र कुमार मोहनलाल परमार याला जेरबंद केले. त्याच्याकडून फसवणुकीतील दोन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात पोलिसांना यश आले.
फरार साथीदाराच्या शोधासाठी मोहीम
या प्रकरणातील दुसरा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे फसवणूक झालेल्या तरुणाला मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, “अनोळखी व्यक्तींच्या अमिषाला बळी पडू नका. सोने किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी अधिकृत ज्वेलर्सकडूनच करा,” असे आवाहन संगमेश्वर पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
पोलिसांचा इशारा
“गुन्हेगार कितीही चलाख असला तरी तो कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाही. मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून फरार साथीदारालाही लवकरच अटक केली जाईल. संगमेश्वर पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर आहेत.”
— प्रवीण देसाई, पोलीस उपनिरीक्षक

