(देवरुख / सुरेश सप्रे)
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम २६(१) अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या देवरुख नगरपंचायतीच्या प्रारूप विकास योजनेवर प्राप्त झालेल्या लेखी सूचना व हरकतींच्या अनुषंगाने संबंधित हरकतदारांची सुनावणी आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम २८(२) अन्वये गठित नियोजन समितीसमोर ही सुनावणी मंगळवार, दि. १४ जुलै २०२६ व बुधवार, दि. १५ जुलै २०२६ रोजी देवरुख नगरपंचायत कार्यालयात होणार आहे.
ज्या नागरिकांनी देवरुख नगरपंचायतीच्या प्रारूप विकास योजनेबाबत लेखी सूचना अथवा हरकती सादर केल्या आहेत, त्यांनी त्यांना पत्राद्वारे कळविण्यात आलेल्या दिनांक व वेळेनुसार आवश्यक कागदपत्रांसह देवरुख नगरपंचायत कार्यालयात उपस्थित राहावे. सुनावणीदरम्यान नियोजन समितीसमोर आपली बाजू मांडण्याची संधी संबंधितांना दिली जाणार आहे.
सर्व संबंधित हरकतदारांनी निश्चित वेळेचे पालन करून सुनावणीस उपस्थित राहावे, असे आवाहन देवरुख नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी केले आहे.

