(रायगड)
कोकणवासीयांसाठी अभिमानाची बाब ठरावी अशी यशोगाथा घडवली आहे दानियाल सलीम चोगले या २७ वर्षीय युवकाने. कोकणातील पहिला एअरक्राफ्ट इंजिनीअर होण्याचा मान त्याने पटकावला असून, सध्या तो इंडिगो एअरलाईन्समध्ये एअरक्राफ्ट इंजिनीअर म्हणून कार्यरत आहे. दानियालची ही कामगिरी संपूर्ण कोकणासाठी, विशेषतः रोहा व रायगड जिल्ह्यासाठी, प्रेरणादायी ठरली आहे. सर्वत्र त्याच्या जिद्दीचे आणि परिश्रमांचे कौतुक होत आहे.
जिद्द आणि मेहनतीचा प्रवास
दानियालने शिक्षणाची सुरुवात रोह्यातील जे. एम. राठी स्कूल आणि ज्युनियर कॉलेज येथून केली. लहानपणापासूनच वैमानिक होण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले होते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी त्याने पुण्यातील हिंदुस्थान एरोस्पेस अँड इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये एअरक्राफ्ट इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले (२०१९). शिक्षण घेत असतानाच, त्याने एव्हिएशन क्षेत्रातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या मॉड्यूल परीक्षा उत्तीर्ण केल्या. एअर इंडियामध्ये सहा महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान त्याने सर्व पेपर क्लिअर केले.
दानियालने आपला व्यावसायिक प्रवास विस्तारा एअरलाईन्समध्ये टेक्निशियन म्हणून सुरू केला आणि साडेतीन वर्षांत इंजिनीअर पदापर्यंत मजल मारली. त्यानंतर, आठ महिन्यांपूर्वी तो इंडिगो एअरलाईन्समध्ये रुजू झाला. सध्या त्याच्याकडे Airbus A320 आणि ATR 72 या आधुनिक विमानांवर साइनिंग ऑथोरिटी आहे – म्हणजेच विमानाच्या तांत्रिक तपासणीनंतर उड्डाणासाठी अंतिम मान्यता देण्याचा अधिकार.
दानियालचे वडील सलीम चोगले, हे रायगड जिल्हा अल्पसंख्यांक विकास मंचाचे व रोहा एज्युकेशन अँड वेल्फेअर असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या सलीम चोगले यांनी अभिमानाने सांगितले, “दानियालने अविरत परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर आपले स्वप्न पूर्ण केले. त्याच्या यशामुळे आम्हाला अभिमान वाटतो. हे यश हजारो तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
दानियाल सलीम चोगले याने एव्हिएशनसारख्या कठीण क्षेत्रात आपली ठसा उमटवून दाखवले आहे की प्रचंड मेहनत, स्पष्ट ध्येय आणि चिकाटी असली, तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही. “स्वप्न पहा, ध्येय ठरवा आणि अखंड मेहनत घ्या – यश तुमच्या पावलांशी खेळेल,” असा संदेश दानियालच्या यशातून कोकणातील नवतरुणांना मिळतो आहे.