(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर एसटी स्थानक परिसरातील चिखल, साचलेले पाणी आणि प्रवाशांना भेडसावणाऱ्या गैरसोयीच्या प्रश्नावरून भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे तालुका उपाध्यक्ष मिथुन निकम आणि तालुका युवाध्यक्ष स्वप्नील सुर्वे यांनी कार्यकर्त्यांसह आज (गुरुवार)) एसटी स्थानकात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. तसेच, आजच प्रश्न निकाली न काढल्यास शुक्रवारी स्थानक परिसरातील चिखलात प्रतीकात्मक वृक्षारोपण आंदोलन करण्याचा इशारा दिला.
यापूर्वी स्थानकातील दुरवस्थेबाबत वृत्त प्रसिद्ध होऊनही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्याचा आरोप करत भाजप पदाधिकाऱ्यांनी स्थानक वाहतूक नियंत्रकांची भेट घेतली. स्थानक परिसरात सर्वत्र चिखल आणि पाणी साचल्यामुळे शाळकरी मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे पावसाचे पाणी स्थानकात येत असल्याचे सांगत संबंधित ठेकेदाराकडे जबाबदारी असल्याचे नमूद केले. मात्र, हा युक्तिवाद फेटाळत भाजप पदाधिकाऱ्यांनी स्थानक परिसराची देखभाल आणि प्रवाशांना सुरक्षित सुविधा उपलब्ध करून देणे ही एसटी महामंडळाचीच जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले.
यानंतर मिथुन निकम यांनी एसटीच्या विभागीय नियंत्रकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून स्थानकातील परिस्थितीची माहिती दिली. “आजच चिखल हटवून कायमस्वरूपी उपाययोजना सुरू न झाल्यास उद्या स्थानक परिसरात चिखलातच वृक्षारोपण आंदोलन करण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.
सध्या सुरू असलेल्या पावसामुळे स्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात चिखल आणि पाणी साचत असून प्रवाशांना जीव धोक्यात घालून बसमध्ये चढावे लागत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही ठोस उपाययोजना झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
मिथुन निकम म्हणाले, “प्रशासनाने तात्पुरती मलमपट्टी न करता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा. अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
तर स्वप्नील सुर्वे यांनी, “प्रवाशांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. एसटी महामंडळाने आपली जबाबदारी पार पाडून तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी केली.
आता भाजपच्या इशाऱ्यानंतर एसटी प्रशासन तातडीने कारवाई करते की आंदोलनाला सामोरे जाते, याकडे संगमेश्वर तालुक्याचे लक्ष लागले आहे.

