(संगमेश्वर)
तालुक्यातील कडवई येथील जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे या बँकेचे नवीन एटीएम केंद्र सुरू करण्यात आले आहे. कडवईचे उपसरपंच श्री. दत्ताराम ओकटे यांच्या हस्ते या एटीएम केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
या नवीन सुविधेमुळे कडवई आणि आसपासच्या आठ ते दहा गावातील नागरिकांना बँकिंग सेवा सहज उपलब्ध होणार आहेत. ठेवीदार आता पैसे जमा करणे, पैसे काढणे, मिनी स्टेटमेंट घेणे, मोबाईल नंबर अपडेट करणे, चेक बुक रिक्वेस्ट, आणि फंड ट्रान्सफर करणे यांसारख्या सुविधांचा लाभ घेऊ शकतात.
याआधी कडवई येथील नागरिकांना बँकिंग सेवा घेण्यासाठी संगमेश्वर किंवा आरवली येथे जावे लागत होते, परंतु या नवीन एटीएम केंद्रामुळे स्थानिक नागरिकांची मोठी गैरसोय दूर होईल, असे उपसरपंच श्री. दत्ताराम ओकटे यांनी सांगितले. जनता सहकारी बँक १३ जानेवारीला आपल्या नवीन जागेत स्थलांतरित झाली असून, यानंतर एटीएम सुविधा सुरू झाल्यामुळे व्यापारी वर्गालाही मोठा दिलासा मिळाला आहे.
उद्घाटन प्रसंगी बँकेचे शाखाधिकारी विश्वास आठवले, विलास पुरोहित, ग्राम पंचायत सदस्य सोमा मादगे, राजीव पाध्ये, सुहास पाध्ये, सागर गुरुपादगोळ, विजय पंडित, लक्ष्मण ओकटे, मुख्य कचेरी मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ अधिकारी संदीप गानू, चिपळूण शाखा व्यवस्थापक ओंकार गोंधळेकर, संगमेश्वर शाखा व्यवस्थापक विवेक लळीत, माखजन शाखा व्यवस्थापक अमोल अंतरकर आणि बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.