[ संगमेश्वर/प्रतिनिधी ]
देवरुख-रत्नागिरी मार्गावरील पाटगाव घाटात रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. भरधाव कार आणि मोटरसायकल यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत तीन तरुण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
हा अपघात दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास पाटगाव घाटातील धोकादायक वळणावर घडला. प्राथमिक माहितीनुसार, मोटरसायकलवरील तरुण तुळसणीच्या दिशेने येत होते. त्याचवेळी देवरुखच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कार थेट समोरून येणाऱ्या मोटरसायकलवर आदळली. धडकेची तीव्रता इतकी मोठी होती की, दुचाकी रस्त्याबाहेर फेकली गेली. यामुळे दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींच्या मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलीसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच स्थानिक प्रशासनाच्या मदतीने तिन्ही जखमींना तातडीने जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
पाटगाव घाटातील तीव्र वळण, वेग आणि वाहनावरील नियंत्रण सुटणे या कारणांमुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण काय, याचा तपास पोलीस करीत असून, अधिक माहितीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, पाटगाव घाटातील धोकादायक वळणांवर वारंवार अपघात होत असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवून अत्यंत सावधगिरीने वाहन चालविण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

