(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी परिसरात चोरट्यांनी कष्टकरी कामगाराच्या उदरनिर्वाहाच्या साधनावरच हात साफ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरासमोर उभी असलेली ‘इको’ गाडी अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास शिताफीने पळवून नेली. भरवस्तीत घडलेल्या या धाडसी चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मूळ कर्नाटक येथील मारुती नागेश सुतार हे बुरंबी येथे भाड्याने राहून गवंडीकाम करून उदरनिर्वाह करतात. आज (सोमवारी, २७ एप्रिल) रोजी पहाटे सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास, परिसरात शांतता असताना चोरट्यांनी त्यांच्या घरासमोरील शेडला लक्ष्य केले. यावेळी सुमारे १ लाख ५० हजार रुपये किमतीची ग्रे रंगाची ‘इको’ गाडी (क्रमांक एमएच ०८ झेड ४७०३) चोरून नेण्यात आली. या गाडीची ओळख म्हणून काचेवर ‘श्री कालिका देवी प्रसन्न’ आणि ‘ब्रम्हांडनायक’ अशी अक्षरे कोरलेली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटनेची गांभीर्याने दखल घेत संगमेश्वर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अंतर्गत चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक आर. एस. गावित यांनी तपास सुरू केला असून, संशयितांचा माग काढण्यासाठी विविध ठिकाणी बिनतारी संदेश पाठवण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणाचा अहवाल देवरुख न्यायालयातही सादर करण्यात आला आहे.
कष्टकरी वर्गालाच लक्ष्य करणाऱ्या या चोरीमुळे संताप व्यक्त होत असून, आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

