(संगमेश्वर / रुपेश कदम)
गेल्या अनेक महिन्यांपासून संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वरील गैरसोयींबाबत “निसर्गरम्य चिपळूण-संगमेश्वर (रेल्वे)” फेसबुक ग्रुपने सातत्याने पाठपुरावा करत आवाज उठवला होता. आता या प्रयत्नांना यश येताना दिसत असून फलाट क्रमांक २ वर पेव्हर ब्लॉक आणि सौंदर्यीकरणाचे काम लवकरच सुरू होणार आहे.
फलाटावरील अस्वच्छता, असमान पायाभूत सुविधा, आसन व्यवस्था, दिवे, पंखे, पाणी, तिकीट आरक्षण, एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर ग्रुपकडून वेळोवेळी निवेदन व आंदोलन करण्यात आले. यामध्ये अनेक समस्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.
या संपूर्ण मोहिमेचे नेतृत्व संदेश जिमन व त्यांच्या सहकाऱ्यांनी झोकून देऊन केले. लोकप्रतिनिधी, रेल्वे प्रशासन आणि स्थानिक नागरिकांशी केलेल्या सातत्यपूर्ण संवादातून हा मार्ग मोकळा झाला आहे.
आमदार शेखर निकम यांच्या पुढाकारातून रु. २३,३६,५५४/- इतका निधी मंजूर झाल्याने हे काम आता प्रत्यक्षात येत आहे. त्यांच्या प्रभावी हस्तक्षेपाबद्दल ग्रुप आणि सर्व प्रवाशांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.
संगमेश्वरच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीला आणि पर्यटन शक्यतांना चालना मिळावी, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, कोकणातील जीवनशैली अधिक समृद्ध व्हावी यासाठी “निसर्गरम्य चिपळूण-संगमेश्वर (रेल्वे)” फेसबुक ग्रुप नेहमीच कार्यरत असून भविष्यातही असेच प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.