(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर शहर परिसरात बिबट्याचा वावर सुरु असून मुक्या जनावरंच्या रक्ताला चटावलेला बिबट्या भक्ष्य शोधार्थ सैरवैर भटकंती करत असल्याची सर्वत्र चर्चा पसरून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर एका पाळीव कुत्र्याची शिकार करण्याचा प्रयत्न आयशस्वी ठरला असल्याचे वृत्त दोन दिवसापूर्वी प्रसारमाध्यम तसेच वृत्तपत्रात प्रसारित झाले होते. दरम्यान, येथील सौरभ रसाळ यांच्या चारचाकीला असलेल्या कॅमेऱ्यात मुक्तपणे भटकंती करणारा बिबट्या कैद झाल्याने बातमीला पुष्टी मिळाली आहे.
गेले काही दिवस संगमेश्वर शहर तसेच संभाजी नगर भागात बिबट्याचा वावर सुरु असून भूक भागवण्यासाठी मुक्या प्राण्यांची शिकार करण्यासाठी भटकंती करताना काहींना बिबट्याचे दर्शन सुद्धा झाले असल्याचे बोलले जात होते. एवढेच नव्हे तर शहरात वावरणाऱ्या मोकाट कुत्र्यांच्या संख्येतही घट झाल्याचे जाणवत असल्याने बिबट्याने पोटाची भूक शमविण्यासाठी मोकाट कुत्र्यांची शिकार केली असावी असे बोलले जात होते, ती बाबही आता खरी ठरली आहे.
मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गां पलीकडे डोंगरावर वसलेल्या संभाजी नगर येथील दादू कुष्टे यांच्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. मात्र त्याची शिकार करण्यात तो अपयशस्वी ठरला. या हल्ल्यात कुत्रा जखमी झाला होता. यावरून असे लक्षात येते की, शहरातून राष्ट्रीय महामार्ग ओलांडून संभाजी नगरपर्यंत बिबटयाचे वावरणे सुरु आहे. बिबट्या च्या दहशतीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. तसेच काही वाहन चालकांना सुद्धा बिबट्याचे दर्शन झाल्याची चर्चा होती त्यामुळे शहर अंतर्गत रस्त्यावरील रात्रीची वाहन वर्दल सुद्धा रोडवली होती.
आता तर चक्क बिबट्या कॅमेऱ्यातच कैद झाला आहे. शहाराच्या ठिकाणी असलेल्या मानवी वस्तीत तो वावरताना आढळला आहे. संगमेश्वर येथील सौरभ रसाळ हे त्यांच्या चारचाकी गाडीने मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गांवररून पोस्ट कार्यालयाकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याने शुक्रवारी रात्री 10 च्या सुमारास जात असताना गाडीच्या आवाजाने बिबट्याने रस्त्याच्या एका बाजूने दुसऱ्या बाजूला धूम ठीकली, हे दृश्य त्यांच्या गाडीच्या कॅमेऱ्यात कैद झाले आहे.