(दापोली)
दापोली तालुक्यातील मांदिवली गावात उत्पन्नाच्या दाखल्यावर स्वाक्षरी व शेरा देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी केळशी येथील तलाठी राजेंद्र उंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
घटनेची थोडक्यात हकिगत अशी आहे की, तक्रारदाराने उत्पन्नाचा दाखला मिळावा यासाठी अर्ज केला होता. त्यावर स्वाक्षरी व शेरा देण्यासाठी तलाठी उंडे (सजा – केळशी, अतिरिक्त पदभार – मांदिवली) यांनी दि. ५ जून रोजी तक्रारदाराकडे २०,००० रुपयांची लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने ही बाब तात्काळ अँटी करप्शन ब्युरो, रत्नागिरी यांच्याकडे कळवली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचत १० जून रोजी दुपारी २.३० वाजता पंचासमक्ष लाच स्वीकारताना तलाठी राजेंद्र उंडे यांना रंगेहाथ पकडले.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया संध्याकाळपर्यंत सुरू होती. या कारवाईमुळे महसूल व प्रशासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
सापळा कारवाईत सहभागी अधिकारी: सापळा अधिकारी: मच्छिंद्र जाधव (पोलीस निरीक्षक, रत्नागिरी), सहाय्यक फौजदार: चांदणे, पोलिस कर्मचारी: संजय वाघाटे, विशाल नलावडे, श्रेया विचारे, दीपक आंबेकर, हेमंत पवार, राजेश गावकर, समिता क्षीरसागर, प्रशांत कांबळे
जनतेसाठी आवाहन
कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी अथवा खाजगी एजंट तुमच्याकडून शासकीय कामासाठी अधिकृत शुल्काशिवाय लाच मागत असल्यास, तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, रत्नागिरी यांच्याशी संपर्क साधा:
📞 दूरध्वनी: 02352-222893
☎️ टोल फ्री क्रमांक: 1064
📱 पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील (ACB रत्नागिरी): 7588941247

