( रत्नागिरी )
राज्यस्तरावर राबविण्यात आलेल्या ‘इम्युनायझेशन कव्हरेज स्टडी’ मोहिमेत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल रत्नागिरी जिल्ह्याच्या तिन्ही लसीकरण सनियंत्रकांचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या गौरवप्रसंगी प्रत्येक सनियंत्रकाला प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. १० ते २० जून २०२४ या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रात संचालक, आरोग्य सेवा, पुणे आणि आयुक्त, आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली ही अभ्यासमोहीम राबविण्यात आली होती.
रत्नागिरी जिल्ह्यातील लसीकरण सनियंत्रक तुषार साळवी, बालाजी राठोड आणि श्वेता सावंत यांनी या मोहिमेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील विविध प्राथमिक व उपजिल्हा रुग्णालयांना भेटी दिल्या. तेथील ० ते ५ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे नियमित लसीकरण प्रत्यक्ष पडताळून, संपूर्ण लसीकरण प्रक्रियेचा सखोल अभ्यास त्यांनी केला. त्यानंतर संबंधित तपशील कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे अहवाल स्वरूपात सादर करण्यात आला.
या कामगिरीसाठी त्यांना डॉ. अनिरुद्ध आठल्ये (जिल्हा आरोग्य अधिकारी), डॉ. पल्लवी पगडाळ (तत्कालीन जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी), SMO डॉ. खैरनारे, तसेच PHN श्वेता तारये, प्रिया पेडणेकर, कौस्तुभ भाटकर, नीलेश विचारे आणि अभिजीत कांबळे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. या उपक्रमातून रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा दर्जा आणि कार्यक्षमतेची पुनःप्रतीती मिळाली असून, लसीकरण मोहिमेतील जिल्ह्याची कार्यपद्धती राज्यस्तरावर उदाहरण म्हणून समोर आली आहे.