(खेड/ रत्नागिरी)
अचानक चक्कर आल्याने प्रकृती बिघडलेल्या खेड तालुक्यातील ६२ वर्षीय व्यक्तीचा ब्रेन स्ट्रोकवरील उपचारादरम्यान मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात मृत्यू झाला. शस्त्रक्रिया करूनही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा न झाल्याने त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. मधुकर केरू झगडे (वय ६२, रा. पोयनार, ता. खेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी मधुकर झगडे यांना अचानक चक्कर आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी दापोली येथील पटवर्धन रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना ब्रेन स्ट्रोक झाल्याचे सांगत पुढील उपचारांसाठी मुंबईला नेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार १४ ऑक्टोबर रोजी त्यांना मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी ब्रेन स्ट्रोकवरील शस्त्रक्रिया केली. मात्र, उपचार सुरू असूनही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर २२ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कर्तव्यावरील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद मुंबईतील सर जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यू म्हणून करण्यात आली होती. त्यासंबंधीची कागदपत्रे २७ ऑक्टोबर रोजी टपालाद्वारे खेड पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात आली. ही कागदपत्रे ३१ ऑक्टोबर रोजी प्राप्त झाल्यानंतर खेड पोलिसांनी अपमृत्यू क्रमांक ९१/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम १९४ नुसार नोंद केली आहे. याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू आहे.


