(लांजा /रत्नागिरी)
‘पुण्याला जातो’ असे सांगून घरातून बाहेर पडलेला लांजा तालुक्यातील २३ वर्षीय तरुण अद्याप घरी परतलेला नसल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. स्वप्निल धनंजय जाधव असे या तरुणाचे नाव असून, त्याला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याप्रकरणी त्याच्या काकूने दिलेल्या फिर्यादीनंतर लांजा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वप्निल जाधव (वय २३, व्यवसायाने चालक) हा मूळचा इंदवटी जाधववाडी, ता. लांजा येथील रहिवासी असून सध्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात गोटवडे फाटा, मावळी निगते वस्ती येथे वास्तव्यास होता. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास तो इंदवटी जाधववाडी येथून पुण्याला जात असल्याचे सांगून घरातून निघाला.
मात्र, बराच वेळ उलटूनही तो घरी परतला नाही. स्वप्निलचा शोध घेऊनही त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळत नसल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. अखेर त्याच्या काकू सुवर्णा सुनील जाधव (वय ६२, रा. इंदवटी जाधववाडी) यांनी लांजा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. स्वप्निलला फिर्यादीच्या संमतीशिवाय अज्ञात व्यक्तीने फूस लावून अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचा संशय त्यांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे.
या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १४०(३) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वप्निलचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करीत आहेत.


