(गणपतीपुळे / वैभव पवार)
जागतिक कीर्तीचे पर्यटनस्थळ आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी होमगार्डांकडून प्रभावीपणे काम केले जात आहे. समुद्रस्नानासाठी खोल पाण्यात जाणाऱ्या पर्यटकांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासह समुद्रातील संभाव्य धोक्यांविषयी त्यांना सूचना देणे आणि संपूर्ण समुद्रकिनाऱ्यावर नियमित गस्त घालण्याची जबाबदारी होमगार्ड जवानांकडून पार पाडली जात आहे.
जयगड पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत सध्या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर दहा होमगार्ड जवान नियुक्त करण्यात आले आहेत. पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे जवान आपले कर्तव्य प्रामाणिकपणे आणि गांभीर्याने बजावत आहेत. यापूर्वी गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या दुर्घटना लक्षात घेऊन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.
समुद्रस्नानासाठी येणाऱ्या पर्यटकांना खोल पाण्यात न उतरण्याच्या सूचना देणे, कमी पाण्यातच स्नान करण्याचे आवाहन करणे आणि समुद्राच्या धोकादायक स्थितीची माहिती देणे, यावर होमगार्डांकडून भर दिला जात आहे. एखादा पर्यटक पाण्यात बुडत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याला तातडीने बाहेर काढण्यासाठी आवश्यक सूचना देण्याचे कामही केले जात आहे. दिवसभर समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालून पर्यटकांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
जयगड पोलीस ठाण्याच्या ताब्यात असलेल्या ‘सी-प्रहरी’ सायकलींच्या माध्यमातूनही होमगार्ड जवान समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालत आहेत. त्यामुळे किनाऱ्यावरील विविध भागांमध्ये लक्ष ठेवणे शक्य होत आहे. होमगार्डांची संख्या वाढविण्यात आल्याने पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अधिक दक्षता घेतली जात असल्याचे चित्र आहे. या कामगिरीबद्दल पर्यटक, स्थानिक व्यावसायिक आणि ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
मालगुंड आणि उंडी समुद्रकिनाऱ्यांवरही होमगार्ड तैनात
गणपतीपुळे समुद्रकिनारा संवेदनशील असल्याने जयगड पोलीस ठाण्याकडून येथे होमगार्डांची संख्या वाढविण्यात आली आहे. यासोबतच जवळच्या मालगुंड आणि उंडी समुद्रकिनाऱ्यांवरही होमगार्ड तैनात करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या तिन्ही समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत होमगार्ड जवानांकडून कर्तव्य बजावले जात आहे.
गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर ग्रामपंचायतीचे जीवरक्षक, देवस्थानचे सुरक्षारक्षक आणि वॉटर स्पोर्ट्सशी संबंधित यंत्रणाही कार्यरत आहेत. या सर्वांच्या उपस्थितीमुळे पर्यटकांच्या सुरक्षेला अधिक बळ मिळाले असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. समुद्रकिनाऱ्यावर होमगार्डांची वाढलेली संख्या आणि नियमित गस्तीमुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी अधिक प्रभावी व्यवस्था निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.


