(रत्नागिरी / प्रतिनिधी)
शहरातील सुरक्षित समजल्या जाणाऱ्या Ratnagiri Railway Station परिसरातच दुचाकी चोरीची घटना उघडकीस आल्याने वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. रेल्वे स्थानकाच्या स्टाफ पार्किंगमधून काळ्या रंगाची होंडा युनिकॉर्न (MH 08 AH 1974) ही सुमारे १५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.
फिर्यादी विलास विश्वास तांबे (वय ४२, रा. पत्रकार कॉलनी, कुवारबाव) हे रेल्वे स्थानक परिसरात नोकरीस असून, त्यांनी १४ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ८.२० वाजता आपली दुचाकी स्टाफ पार्किंगमध्ये उभी केली होती. दुसऱ्या दिवशी १५ फेब्रुवारी रोजी दुपारी ते परत आले असता, वाहन जागेवरून गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सर्वत्र शोधाशोध करूनही गाडीचा मागमूस न लागल्याने त्यांनी १८ फेब्रुवारी रोजी शहर पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
CCTV ‘शोपीस’ की सुरक्षा कवच?
रेल्वे स्थानक परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा अस्तित्वात असतानाही स्टाफ पार्किंगमधून दुचाकी सहजपणे बाहेर कशी नेली गेली, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गर्दीची वर्दळ, ये-जा करणारी वाहने आणि सुरक्षारक्षकांची उपस्थिती असूनही चोरी होणे ही बाब अधिकच गंभीर ठरत आहे. सीसीटीव्ही कॅमेरे केवळ शोपीससाठी लावले आहेत का? असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.
सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
रहदारीच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला जाणे हेच दुर्दैवी आहे. रेल्वे स्थानक परिसरातील वाहनांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे. सध्या पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे ‘सुरक्षित’ मानल्या जाणाऱ्या सार्वजनिक पार्किंग व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला असून, स्थानक परिसरातील सुरक्षाव्यवस्थेचा पुनर्विचार करण्याची वेळ आल्याची चर्चा रंगू लागली आहे.

