दिघी (ता. श्रीवर्धन)
मामाच्या गावी पर्यटनासाठी आलेल्या २४ वर्षीय तरुणाचा दगड खाणीतील खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शनिवारी सायंकाळी खानलोशी (ता. श्रीवर्धन) येथील एका जुन्या दगड खाणीच्या पाणवठ्यात घडली.
मृत तरुणाचे नाव तेजस सुनील निगुडकर (वय २४, मूळगाव काळींजे, सध्या राहणार दिवा, ठाणे) असे असून, तो आपल्या कुटुंबासह श्रीवर्धन तालुक्यातील काळींजे गावात आपल्या मामाकडे आला होता. यावेळी कातळकर कुटुंबीय, तेजस आणि त्याची मामे भावंडे अशी सहाजणे दिवेआगर येथे पर्यटनासाठी गेली होती. परतीच्या मार्गावर म्हसळा-दिघीमार्गे जात असताना, खानलोशी परिसरातील एक जुनी दगड खाण आणि त्यातील खोल पाण्याचे ठिकाण त्यांचे लक्ष वेधून गेले. यामुळे सर्वांनी थोडावेळ पोहण्याचा निर्णय घेतला.
पाण्यात उतरले असताना, तेजस थोडासा पुढे गेला. त्याला पाण्याच्या अचानक वाढलेल्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे तो बुडू लागला. ही बाब लक्षात येताच अनुज कातळकर आणि आर्यन कांबळे यांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला. सुमारे दहा मिनिटे त्यांनी पाण्यात शोध घेतला; मात्र तेजस सापडला नाही. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली आणि अखेर तेजसला पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
त्याला तत्काळ बोर्लीपंचतन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या अनपेक्षित आणि दुर्दैवी घटनेने खानलोशी व काळींजे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, निगुडकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.