(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर शहरातील मानवी वस्तीत बिबट्याचा वावर असल्याचे आता सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. मापारी मोहल्ल्यातील रऊफ खान यांच्या घराच्या अंगणातून तोंडात शिकार पकडून बिबट्या जात असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले आहे. काल मध्यरात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
मापारी मोहल्ल्यातील पोलीस वसाहतीसमोरील रस्त्यावरून आलेल्या बिबट्याने थेट रऊफ खान यांच्या घराच्या अंगणात प्रवेश केला. त्यावेळी त्याच्या तोंडात एखादा वन्यप्राणी किंवा अन्य शिकार असल्याचे फुटेजमध्ये दिसत आहे. कोणतीही घाई न करता बिबट्या अंगणातून पुढे जात असल्याचे चित्रण झाले आहे. शहरातील दाट लोकवस्तीमध्ये, थेट घराच्या आवारात बिबट्याचा असा वावर दिसून आल्याने स्थानिक रहिवाशांची चिंता वाढली आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून संगमेश्वर बाजारपेठ आणि रामपेठ परिसरात रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या काही वाहनचालकांना बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू होती. मात्र, या चर्चांना ठोस आधार नसल्याने अनेकांनी त्याकडे ऐकीव माहिती म्हणून पाहिले होते. आता मापारी मोहल्ल्यातील सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने शहरातील मध्यवर्ती भागातही बिबट्याचा संचार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
या घटनेमुळे रात्रीच्या वेळी शहरातून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रात्री उशिरा कामावरून घरी परतणारे नागरिक, दुचाकीस्वार, पादचारी तसेच पहाटेच्या वेळी घराबाहेर पडणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्या केवळ रस्त्यावरून जात नसून घरांच्या अंगणापर्यंत पोहोचत असल्याचे या घटनेतून दिसून आले आहे. त्याच्या तोंडात दिसणारी शिकार नेमकी कोणत्या प्राण्याची होती, याबाबत मात्र अद्याप स्पष्टता झालेली नाही.
रऊफ खान यांच्या घरातील सीसीटीव्ही फुटेजमुळे संगमेश्वर शहरातील बिबट्याच्या वावराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. बाजारपेठ, रामपेठ आणि मापारी मोहल्ला परिसरात बिबट्या दिसल्याच्या चर्चांनंतर आता घराच्या अंगणातील त्याची हालचालही समोर आली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना अधिक सावध राहण्याची चिंता व्यक्त होत आहे.


