(रत्नागिरी / वार्ताहर)
प्राथमिक आरोग्य केंद्र, पाली येथे प्रशांत शंकर ताम्हणकर (वय ३९) यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र महादेव ताम्हणकर हे सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास झोप घेऊन उठले असता त्यांचा चुलत भाऊ प्रशांत ताम्हणकर चहा पिऊन घरात बसलेले असताना दिसले. त्यानंतर काही वेळाने प्रशांत पुन्हा झोपले.
सकाळी साडेआठच्या सुमारास महेंद्र हे प्रशांत यांना उठवण्यासाठी गेले असता ते कोणतीही हालचाल करीत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे प्रशांत यांना तातडीने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, पाली येथे नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दुपारी ३.३५ वाजण्याच्या सुमारास त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद १६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३१ वाजता रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली. प्रशांत ताम्हणकर यांच्या मृत्यूचे नेमके कारण तपासानंतर स्पष्ट होणार आहे.


