(ठाणे)
ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम भागात पती-पत्नीच्या वादातून घडलेली एक धक्कादायक घटना समोर आली आहे. रागाच्या भरात पत्नीने पतीच्या अंगावर उकळते तेल फेकले. या घटनेत पती गंभीररित्या भाजला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ४८ वर्षीय इमरान अब्दुल गफ्फार शेख हे ऑटो रिक्षा चालवतात. बुधवारी मध्यरात्री इमरान आणि त्यांच्या पत्नीमध्ये वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की पत्नीने स्वयंपाकघरातून उकळते तेल आणून थेट इमरानच्या अंगावर फेकले. या हल्ल्यात इमरान यांचा चेहरा, डोळे आणि हात गंभीर भाजले गेले. घटनेनंतर इमरान यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या स्थिर असली तरी भाजलेली दुखापत गंभीर स्वरूपाची आहे.
या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला असून सध्या नातेवाईकांचे जबाब नोंदवले जात आहेत. प्राथमिक तपासात ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचे स्पष्ट झाले आहे. तपासाअंती पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

