(रायगड)
मुंबई–गोवा महामार्गावरील पेण येथील तरणखोप ब्रिजवर बुधवारी दोन ट्रेलरमध्ये भीषण अपघात झाला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, मात्र दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, पेण–पनवेलच्या दिशेने जाणारा ट्रेलर काही कारणास्तव ब्रिजवर थांबलेला होता. त्याचवेळी मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेलरचा वेग नियंत्रणाबाहेर गेला आणि त्याने थांबलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिली. धडक देणाऱ्या ट्रेलरच्या चालकाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी चालकाला तात्काळ बाहेर काढून पेण सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या चालकाची प्रकृती स्थिर आहे.
घटनेची माहिती मिळताच पेण उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल आणि पोलिस निरीक्षक संदीप बागुल बचाव पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातग्रस्त वाहने रस्त्याच्या कडेला हलवून वाहतूक सुरळीत केली. जखमी चालकाला तत्काळ वैद्यकीय मदत दिली आणि महामार्गावर निर्माण झालेली कोंडी त्वरित दूर केली.

