(नाशिक / प्रतिनिधी)
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे गुरुपुत्र श्री. नितीनभाऊ मोरे यांच्या हस्ते मराठवाड्यातील पैठण, गेवराई आणि अंबड तालुक्यातील शेकडो पूरग्रस्त कुटुंबीयांना “मराठवाडा पूरग्रस्त सेवा अभियान”द्वारे जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करून त्यांना धीर आणि दिलासा देण्यात आला.
सेवामार्गाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने गुरुपीठाचे उपव्यवस्थापक श्री नितीनभाऊ मोरे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली सेवामार्गातर्फे राज्यभर “पूरग्रस्त सेवा अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानाद्वारे मराठवाड्यातील पूरग्रस्त जनतेला जीवनावश्यक वस्तू, औषधे आणि वस्त्रांचे वाटप सुरू आहे. त्याकरिता सेवामार्गाच्या बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाचे सेवेकरी अविश्रांत मेहनत घेत असून हजारो सेवाकेंद्रांमधून मदत संकलित करण्यात येत आहे. जमा झालेली मदत पूरग्रस्तांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य नियोजनपूर्वक केले जात आहे.
सेवामार्गातर्फे सात गावांमध्ये मदत
पैठण तालुक्यातील वडवली, नायगाव आणि मायगाव तर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील आगर नांदूर,गोंदी, संगमजळगाव तसेच अंबड तालुक्यातील शहागड गावातील शेकडो पूरग्रस्तांना गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांनी गावात जाऊन आवश्यक साहित्याचे वाटप केले आणि ग्रामस्थांना धीर व दिलासा दिला.
रत्नागिरी, संभाजीनगर, बीड, जालन्यातून मदत..
संभाजीनगरमधील बजाज नगर, गारखेडा, एन नाईन तसेच रत्नागिरी सेवाकेंद्र,बीड शहर, गेवराई, उत्तर अहिल्यानगर, जालना येथील सेवाकेंद्रांनी पूरग्रस्तांना भरघोस मदत पाठवली होती. या मदतीचे वितरण श्री. नितीन मोरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. अजूनही ठिकठिकाणच्या सेवाकेंद्रांमधून मदत संकलित केली जात आहे.

