( मुंबई )
सप्टेंबर 2025 पूर्वी टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. शिक्षकांसाठी टीईटी परीक्षा बंधनकारक असली तरी सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच दोन वर्षांत ही परीक्षा देण्याचे आदेश दिले होते. यामुळे पूर्वीच परीक्षा दिलेल्या शिक्षकांनाही पुन्हा परीक्षा द्यावी लागेल का, असा प्रश्न निर्माण झाला होता.
पुण्यातील सागर चोरगे आणि संगीता साळुंखे या दोन शिक्षकांनी 2019-20 मध्ये टीईटी परीक्षा उत्तीर्ण केली होती. मात्र 31 मार्च 2019 नंतर परीक्षा दिल्यामुळे त्यांची विनाअनुदानित शाळेतून अनुदानित शाळेत बदली होत नव्हती. या अन्यायाविरोधात त्यांनी ॲड. सुरेश पाकळे, ॲड. सौरभ पाकळे आणि ॲड. निलेश देसाई यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने स्पष्ट केले की, टीईटी परीक्षा उत्तीर्ण शिक्षकांची सेवा बाधित होणार नाही आणि पदोन्नतीत कोणताही अडथळा येणार नाही. शिक्षण विभागाचे बदली नाकारणारे आदेश रद्द करत दोन्ही शिक्षकांचे प्रस्ताव मंजूर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.
तसेच, केंद्र सरकारची सीटीईटी व राज्य सरकारची टीईटी या दोन्ही परीक्षांमध्ये कोणताही फरक नाही, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले. त्यामुळे या दोन्ही परीक्षांपैकी एक उत्तीर्ण केलेल्या शिक्षकांनाही दिलासा मिळणार आहे. मात्र, 2019 मधील टीईटी परीक्षेत झालेल्या गैरप्रकारामुळे त्या उमेदवारांना हा निर्णय लागू होणार नाही, असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

