(नाशिक)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे उपनेते सुधाकर बडगुजर यांची पक्षातून अधिकृतपणे हकालपट्टी करण्यात आली आहे. ही कारवाई पक्षविरोधी वक्तव्यांमुळे करण्यात आली असल्याची माहिती सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड आणि जिल्हाप्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. बडगुजर यांच्या हकालपट्टीची घोषणा होताच टाळ्यांच्या कडकडाटात कार्यकर्त्यांनी याचे स्वागत केलं.
दत्ता गायकवाड यांनी सांगितले की, “सुधाकर बडगुजर यांनी पक्षशिस्त भंग करत अनेक पक्षविरोधी विधानं केली. यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उत्तर महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख संजय राऊत यांनी ही निर्णय घेतला. आमचा पक्ष आदेशावर चालतो.”
गायकवाड पत्रकार परिषदेदरम्यान पुढे म्हणाले की, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्याशी फोनवर चर्चा झाली असून, त्यानंतरच बडगुजर यांच्या हकालपट्टीची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, नुकतेच बडगुजर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, “पक्षात झालेल्या संघटनात्मक बदलांमुळे अनेकजण नाराज आहेत. माझी नाराजी कोणावरही नाही, ती स्वतःवरच आहे.” मात्र या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या हकालपट्टीची घोषणा झाली.