(नवी मुंबई)
“अशोक सराफ हे महाराष्ट्राचे अभिमान आहेत. ते अभिनयाचे चालते-बोलते विद्यापीठ असून, मराठी कलेचा कोहिनूर आहेत,” अशा गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. तसेच, “आपण अक्षरे फक्त वाचतो, पण ती पाहूनही आनंद मिळू शकतो, हे अच्युत पालव यांनी सिद्ध केले आहे,” असेही ते म्हणाले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नवी मुंबई शाखेच्यावतीने ऐरोलीत नुकतेच पद्मश्री पुरस्कार घोषित झाल्याबद्दल ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ सुलेखनकार अच्युत पालव यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आपल्या सरकारच्या काळात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात यश आले. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला महाराष्ट्र गीताचा मान मिळवून दिला. याशिवाय मराठी भाषा व कलेसाठी सातत्याने योगदान देण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करता आले, आणि आता पद्मश्री मिळाल्यानंतर पुन्हा सत्कार करण्याचा सन्मान मिळाला. भविष्यात त्यांना पद्मभूषण आणि पद्मविभूषण सारखे राष्ट्रीय पुरस्कार मिळावेत, अशी मनापासून अपेक्षा आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
अच्युत पालव यांचा गौरव
उपमुख्यमंत्र्यांनी अच्युत पालव यांचंही विशेष कौतुक केलं. “त्यांनी अक्षरांची श्रीमंती जनमानसासमोर मांडली. सुलेखनाच्या माध्यमातून कलाविश्वात वेगळी उंची गाठली. नवी मुंबईत लवकरच एक कलादालन उभारण्याचा निर्णय घेतला जाईल,” अशी घोषणा त्यांनी यावेळी केली.
नाट्यगृह आणि कलाकारांचे योगदान
सत्कार सोहळ्याचे आयोजक आणि नाट्य परिषदेच्या नवी मुंबई शाखेचे अध्यक्ष विजय चौगुले यांनी ऐरोलीतील नाट्यगृहाचे काम लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमात अशोक सराफ आणि अच्युत पालव या दोन्ही सत्कारमूर्तींनी मिळालेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रशांत दामले यांनी कोवीड काळात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कलाकारांना केलेल्या मदतीचा विशेष उल्लेख केला. या प्रसंगी खासदार नरेश म्हस्के, अभिनेत्री निवेदिता सराफ, अजीत भुरे, ममीत चौगुले, अनिकेत म्हात्रे, रामअशीष यादव, विजय माने, सरोज पाटील, रोहीदास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

