(मुंबई)
विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला होता. महायुती सरकारच्या प्रचाराचा केंद्रबिंदू ठरलेली ही योजना अनेक महिलांपर्यंत पोहोचली आणि त्या अनुषंगाने सरकारला पुन्हा सत्तेवर येण्यास मदत झाली, असे मानले जाते. मात्र, आता या योजनेच्या अंमलबजावणीत काही अपात्र लाभार्थ्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याच्या घटना समोर येत आहेत. या संदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्यांवर शासन कठोर कारवाई करणार आहे.”
चुकीच्या लाभाचा प्रकार आणि तपासणीची प्रक्रिया
राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना तटकरे म्हणाल्या, “याआधी एका व्यक्तीच्या नावावर तब्बल ३०-३५ अकाउंट्स असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी ती खाती तात्काळ सील करण्यात आली होती. अशाच स्वरूपाचे काही प्रकार सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येही आढळले आहेत. लाभार्थ्यांच्या २.६३ कोटींपेक्षा अधिक नोंदणींपैकी सुमारे २ कोटी ४७ लाख महिलांना लाभ वितरित करण्यात आला आहे. उर्वरित १५-२० लाख नोंदणींची सखोल छाननी सुरू आहे. विभागाच्या माहितीनुसार, २६ लाख नोंदणींचा डेटा सध्या क्रॉस व्हेरिफिकेशन प्रक्रियेत आहे. या प्रक्रियेमधून पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची छाननी केली जात आहे.
रेग्युलरायझेशन आणि रिकव्हरीबाबत शासनाची भूमिका स्पष्ट
“लाडकी बहीण योजनेत रेग्युलरायझेशन गरजेचं आहे. लाभ हे खऱ्या लाभार्थ्यांपर्यंतच पोहोचायला हवेत. जर कोणी शासनाची दिशाभूल करून चुकीचा लाभ घेतला असेल, तर त्यांच्याकडून ती रक्कम परत घेण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,” असे तटकरे यांनी सांगितले.
‘लाडकी बहीण’ योजनेचे नियम होणार कठोर
या घोटाळ्यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, 8 हजारांहून अधिक सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेतला आहे. यात वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. यात सरकारी कर्मचारी महिला, टॅक्स भरणार्या महिला यांचा समावेश आहे. या महिलांनी जवळपास 8 ते 10 महिने योजनेचा फायदा घेतला आहे. तसेच, सरकारी सेवेतून निवृत्त झालेल्या हजारो महिलांनीही याचा लाभ घेतला आहे. तसेच 14 हजारांहून अधिक ‘लाडक्या भावांनी’ फेक खाती आणि खोटी कागदपत्रे वापरून महिलांचे पैसे हडपल्याचा प्रकारही समोर आला होता.
या सरकारी महिला कर्मचाऱ्यांवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. ज्या ‘लाडक्या भावांनी’ पैसे लाटले त्यांचेवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. ‘लाडकी बहीण’ योजनेत मोठे गैरप्रकार आढळत असल्याने या योजनेचे नियम अधिक कठोर करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. शासनाची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर काय कारवाई करायची याबाबत मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासनस्तरावर घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.