(सोलापूर)
पुणे–सोलापूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पनवेलहून अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघालेल्या सहा भाविकांपैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
हा अपघात काल (शनिवारी) रात्री सुमारे ११.४५ वाजण्याच्या सुमारास मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवडी पाटीजवळ, पुणे–सोलापूर महामार्गावर घडला.
पनवेलहून अक्कलकोटच्या दिशेने जात असलेली एरटीका कार (MH-46 Z 4536) अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली. वाहनावरील ताबा सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला असलेल्या मोठ्या झाडावर जोरात आदळली. अपघातावेळी कारमध्ये एकूण सहा प्रवासी होते.
प्राथमिक माहितीनुसार, हे सर्वजण एकमेकांचे मित्र असून स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघाले होते. प्रवाशांमध्ये तीन पुरुष आणि तीन महिलांचा समावेश होता. या भीषण धडकेत पाच भाविकांचा जागीच मृत्यू झाला, तर एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली.
अपघातातून बचावलेल्या जखमी महिलेचे नाव ज्योती जयदास टाकले असून त्या सेक्टर ७, पनवेल, जिल्हा रायगड येथील रहिवासी आहेत. त्यांना तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
या अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. पुणे–सोलापूर महामार्गावरील अपघातांची मालिका पुन्हा एकदा चर्चेत आली असून, वाहनचालकांनी वेग व सुरक्षिततेबाबत अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

