(मुंबई)
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) नागरिक आणि उद्योगांसाठी माहितीप्राप्ती अधिक सुलभ करण्याच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम यांनी मंडळाच्या संकेतस्थळावर “ग्रीन माईंड ए.आय.” (Green Mind AI) या अत्याधुनिक चॅटबॉटचे अनावरण केले. या वेळी मंडळाचे सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंह उपस्थित होते.
या उपक्रमामुळे पर्यावरणविषयक कायदे, शासन निर्णय, औद्योगिक आस्थापनांची श्रेणी, तसेच मंडळाच्या विविध उपक्रमांविषयीची माहिती आता काही सेकंदांत मिळणार आहे. या चॅटबॉटमुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाशी संबंधित माहिती सहज, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने सर्वांना उपलब्ध होईल.
माहितीच्या देवाणघेवाणीसाठी तीनस्तरीय प्रणाली “ग्रीन माईंड ए.आय.” ही प्रणाली तीन स्तरांवर कार्यरत आहे —
पब्लिक चॅटबॉट: नागरिक, उद्योग आणि पर्यावरण क्षेत्रातील संस्थांना शासन निर्णय, मंडळाच्या मार्गदर्शक सूचना आणि कायदेशीर तरतुदी याबद्दल त्वरित माहिती उपलब्ध करून देईल.
इंटरनल ए.आय. पोर्टल: मंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी संवाद, डेटा संकलन आणि अंतर्गत कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.
ॲडमिन पॅनेल: सुरक्षित व्यवस्थापनासाठी डॅशबोर्ड उपलब्ध करून देणार असून, नागरिक आणि मंडळ यांच्यातील समन्वय सुलभ करेल.
चॅटबॉटमुळे पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढणार
मंडळाचे अध्यक्ष सिध्देश कदम म्हणाले, “ग्रीन माईंड ए.आय.मुळे नागरिकांना त्वरित माहिती मिळून संवादाची देवाणघेवाण आणि तक्रारींचे निवारण अधिक परिणामकारकपणे होईल. मंडळाच्या गतीमान कारभारात या चॅटबॉटमुळे मोलाची भर पडेल.”
सदस्य सचिव एम. देवेंद्र सिंह यांनी सांगितले की, “ही प्रणाली पूर्णपणे युजर-फ्रेंडली असून, भविष्यातही मंडळ अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरण व्यवस्थापनात अग्रणी भूमिका बजावत राहील.” या अभिनव “ग्रीन माईंड ए.आय.” चॅटबॉटची निर्मिती एक्सीऑन लॅब्स (Axion Labs) यांनी केली आहे.

