(सोलापूर)
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि समाजप्रबोधनाचे कार्यकर्ते पन्नालाल सुराणा (वय 93) यांचे निधन झाले. नळदुर्ग येथील ‘अपना घर’ येथे रात्रीच्या जेवणानंतर त्यांना अचानक उलटीचा त्रास झाला. तातडीने त्यांना सोलापूरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
समाजसेवेसाठी संपूर्ण आयुष्य वाहिलेल्या पन्नालाल सुराणा यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाचे देहदान करण्याचा निर्णय कुटुंबियांनी घेतला आहे. 9 जुलै 1933 रोजी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत त्यांचा जन्म झाला. बार्शीतील शालेय जीवनातच ते राष्ट्रसेवा दलात दाखल झाले. तरुणपणी जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा सर्वोदय आश्रमात राहून त्यांनी भूदान चळवळीत सक्रिय सहभाग घेतला.
सुराणा यांनी समाज प्रबोधन संस्थेचे तसेच समाजवादी पक्षाच्या राज्य शाखेचे सचिव म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या. महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेतही योगदान देत मराठवाडा दैनिकचे संपादकपद भूषवले. शिक्षण, शेती, बेरोजगारी, सामाजिक विषमता अशा विविध विषयांवर त्यांनी अथक लेखन केले.
जुना समाजवादी पक्ष, जनता पक्ष, अनेक पुरोगामी संघटना आणि जनआंदोलन उभारण्यात सुराणा यांचा मोलाचा सहभाग होता. मराठवाड्यातील भूकंपग्रस्तांसाठी त्यांनी उभारलेल्या ‘आपलं घर’ माध्यमातून अनेक मुलांचे जीवन घडले. भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन मिळवून देण्यासाठीही त्यांनी मोठा संघर्ष केला.
समाजकारण आणि राजकारणात सक्रिय असतानाही एक संवेदनशील लेखक त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दडला होता. ‘ज्ञानबाचे अर्थकारण’ हे त्यांचे पुस्तक अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले. सुमारे सत्तर वर्षे देशातील सामाजिक आणि राजकीय बदलांचे ते प्रत्यक्ष साक्षीदार होते. चले जाव आंदोलनापासून ते स्वातंत्र्योत्तर काळ, आणीबाणी आणि नंतरचे राजकीय परिवर्तन अशा व्यापक प्रवासाचे ज्ञान व अनुभव त्यांच्याकडे होते.
सुराणा यांच्या निधनाने सोलापूरसह संपूर्ण राज्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. समाजकारणाला जीवनाचे ध्येय मानलेल्या या ज्येष्ठ नेत्यांच्या जाण्याने समाजवादी विचारसरणीचा एक दृढ स्तंभ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

