(मुंबई)
मालाड परिसरात महिलांचा वेश परिधान करत चोऱ्या करणाऱ्या एका शक्कलबहाद्दर चोरट्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. रणजीत कुमार उर्फ मुन्ना असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो बिहारमधील खगरिया जिल्ह्याचा रहिवासी आहे.
रणजीत हा दिवसा संभाव्य ठिकाणांची रेकी करायचा, तर रात्री महिलांचे कपडे घालून चोरीसाठी निघायचा. सीसीटीव्हीवर आपली ओळख पटू नये म्हणून तो चोरी करताना रेल्वे ट्रॅक परिसरातून ये-जा करायचा. चोरीनंतर तो पुन्हा ट्रॅकवर जाऊन महिलांचे कपडे बदलून पसार व्हायचा.
आरोपीने मलाड, कांदिवली, बोरिवली परिसरात अनेक घरफोड्या केल्या आहेत. पोलिसांनी आरोपीकडून 36 तोळे हिरेजडित सोनं, 1 किलो चांदी, 13 लाखांची बँक ठेवी, दागिने वितळवण्याचे यंत्र व चोरीसाठी वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत. जप्त दागिन्यांची एकूण किंमत तब्बल 41 लाख रुपये इतकी आहे. तसेच, आरोपीने बिहारमध्ये जमीन खरेदीसाठी 10 लाख रुपये, तर मालवणीत घर खरेदीसाठी 6 लाख रुपये अदा केले होते. या व्यवहारांचीही चौकशी सुरू आहे.
मालाड पोलिसांनी मार्चपासून या चोराचा शोध सुरू ठेवला होता. 100 ते 150 सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर त्याचे महिलांच्या वेशातील चित्रण सापडले. नंतर सापळा रचून आरोपीला मालवणी येथून अटक करण्यात आली. रणजीतच्या अटकेमुळे एकूण 8 घरफोडी प्रकरणांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेमुळे मुंबईतील वाढत्या चोरीच्या घटनांबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे.