(मुंबई / वृत्तसंस्था)
जन्माच्या वेळी अवघे ७०० ग्रॅम वजन असलेल्या मुदतपूर्व जन्मलेल्या बालकाने केईएम रुग्णालयातील डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे मृत्यूशी झुंज देत सुखरूप बरे होण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. नवजात शिशू अतिदक्षता विभागात पाच महिने विशेष उपचार आणि देखरेखीखाली ठेवल्यानंतर या बालकाचे वजन ३.३ किलोग्रॅम झाले आहे. सध्या मातेच्या स्तनपानावर बालकाची वाढ होत असून प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
केईएम रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागाच्या प्रमुख डॉ. अनिता हरिबालकृष्ण यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने या अत्यंत कमी वजनाच्या बालकावर आव्हानात्मक उपचार केले. उपचारांच्या काळात बालकाला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. श्वसनासाठीही विशेष वैद्यकीय मदत देण्यात आली.
उपचार सुरू असताना बालकाला अनेक गुंतागुंतीच्या वैद्यकीय परिस्थितींना सामोरे जावे लागले. मात्र, डॉक्टर आणि परिचारिकांनी सातत्याने प्रकृतीचे निरीक्षण करत तज्ज्ञांच्या समन्वयातून आवश्यक उपचार केले. प्रत्येक आव्हानावर टप्प्याटप्प्याने मात करण्यासाठी वैद्यकीय चमूने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. या सातत्यपूर्ण उपचारांमुळे बालकाच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली आणि त्याचे वजन ३.३ किलोग्रॅमपर्यंत पोहोचले.
वैद्यकीय तज्ज्ञांचे कौशल्य, अत्याधुनिक उपचार सुविधा, विविध विभागांमधील समन्वय आणि सातत्यपूर्ण रुग्णसेवा यांच्या बळावर अत्यंत नाजूक अवस्थेतील नवजात बालकांवरही प्रभावी उपचार करणे शक्य होत असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. अत्यल्प वजनाच्या आणि गंभीर प्रकृतीच्या बालकांना जगण्याची संधी मिळवून देण्यासाठी केईएम रुग्णालयाच्या नवजात शिशू उपचार पथकाने दाखवलेली जिद्द, चिकाटी आणि समर्पण या निमित्ताने अधोरेखित झाले आहे. सार्वजनिक रुग्णालयांमधील प्रगत आणि संवेदनशील आरोग्यसेवेचे महत्त्वही या यशस्वी उपचारांमधून पुन्हा एकदा समोर आले आहे.


