(पनवेल / वृत्तसंस्था)
पनवेल तालुक्यातील करंजाडे परिसरात तरुणाला मारहाण करून महागडा मोबाईल हिसकावण्यासह त्याच्या बँक खात्यातून PhonePe द्वारे पैसे काढून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेचा तपास करत पनवेल शहर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून १ लाख ८४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अब्बासुद्दीन मोहम्मद अल्लाउद्दीन (वय ३२, रा. वरचे ओवळे, पनवेल) हे जेवणासाठी जात असताना पळस्पे ते जेएनपीटी महामार्गालगत करंजाडे परिसरात आरोपींनी संगनमताने त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्याकडील ५९ हजार ९९९ रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. आरोपींनी त्यांच्याकडून मोबाईलमधील PhonePe अॅपचा पासवर्डही जबरदस्तीने मिळवला आणि बँक खात्यातून पाच हजार रुपये काढून घेतले. अशा प्रकारे या घटनेत एकूण ६४ हजार ९९९ रुपयांची लूट झाली. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हजरत पठाण आणि त्यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. तांत्रिक तपास तसेच गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी औस सलमान मुकादम (वय २५), हमजा उर्फ गोलू तस्लीम शेख (वय २३) आणि आवेश जाबीर मालदार (वय २७) या तिघांना अटक केली.
अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी एक लाख रुपये किमतीची बजाज अॅव्हेंजर मोटारसायकल, २० हजार रुपये किमतीचा रेडमी मोबाईल, लुटलेला ५९ हजार ९९९ रुपये किमतीचा विवो मोबाईल, तसेच तीन हजार आणि दोन हजार रुपये अशी एकूण पाच हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. या कारवाईत एकूण १ लाख ८४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
पनवेल शहर पोलिसांनी केलेल्या तपासामुळे करंजाडे येथील मारहाण आणि लूटप्रकरणी तिघांना अटक करण्यात यश आले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर अनोळखी व्यक्तींपासून सावध राहण्याबरोबरच मोबाईलमधील UPI अॅप्सचे पासवर्ड सुरक्षित ठेवण्याचे महत्त्व पुन्हा समोर आले आहे.


