(पुणे)
पुणे जिल्ह्यातील लोणावळा येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळ लायन्स पॉईंटवर एक दुर्दैवी घटना घडली आहे. फिरण्यासाठी आलेल्या भारतीय नौदलातील कर्मचाऱ्याचा 250 फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला. राकेश कुमार मिश्रा (वय 50) असे मृत व्यक्तीचे नाव असून ते लोणावळ्यातील INS शिवाजी येथे कार्यरत होते.
लायन्स पॉईंटवर फिरताना घडला अपघात
ही घटना गुरुवारी दुपारी सुमारे 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली. प्राथमिक माहितीनुसार, राकेश कुमार मिश्रा हे लोणावळा परिसरात पर्यटनासाठी आले होते. लायन्स पॉईंट परिसरात फिरत असताना किंवा फोटो काढत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते थेट 250 फूट खोल दरीत कोसळले. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. दरीत पडल्याचा आवाज ऐकताच तेथील पर्यटकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि पोलिसांना माहिती दिली.
5 तास चालली बचाव मोहीम
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, शिवदुर्ग रेस्क्यू टीम, मावळ आपत्ती व्यवस्थापन पथक तसेच नौदलाचे बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. दुर्गम दरी आणि कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे बचाव कार्यात मोठे आव्हान निर्माण झाले होते. तब्बल पाच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बचाव पथकाने राकेश कुमार मिश्रा यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढला.
शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. धोकादायक पॉईंट्सवर पर्यटकांनी अधिक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

